Saturday, August 4, 2007

वर्षा सहल - मुळशी 2007

बराच दिवस मला आणि ज्ञानेश्वरला नेहमीच्या कामातून बाहेर पडून कुठेतरी सहलीला जायचं असं वाटत होतं. ही कल्पना आम्ही मित्रांमध्ये बोलून दाखवली आणि MSN Conference मध्ये चर्चा रंगली. शेवटी मुळशीला जाण्याचं ठरलं. तारीख मात्र काही केल्या ठरत नव्हती…

सुरुवातीला २१ जुलै २००७ ठरली होती, पण हेमंतला वेळ नव्हता. त्याच्या सोयीप्रमाणे आणि सर्वांच्याच मान्यतेने शेवटी ४ ऑगस्ट २००७ ह्या दिवशी जाण्याचे आम्ही सर्वांनी नक्की केले. शनिवार असल्याने सगळ्यांनाच सोयीचं (आम्ही सगळे ऐटीतले (IT) वाले ना!). साधारण १० मित्र येतील असा अंदाज होता. लगेच सर्व इच्छुकांना एक लेखी निमंत्रणही पाठवलं गेलं.

गळती:

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा..!
काही मित्रांवरती तर आम्हाला आधीच शंका होती - अजय जोशी, मंदार मुळ्ये, पराग जोगळेकर आणि हेमंत धाडणेकर.
  • अजय जोशी आमच्यासोबत येईल का? हा नेहमीचा प्रश्न!! Formality म्हणून त्यालाही निमंत्रण पाठवलं… आणि नेहमीप्रमाणे ते सरळ कच-याच्या डब्यातही गेलं.
  • “तू सहलीला येणारच नाहीस!” असं मंदार मुळ्येला चार दिवसांपूर्वी चिडवत असलेला हेमंतही (नेहमीप्रमाणे) गळाला.
  • पराग जोगळेकर आणि मंदार मुळ्ये यांनीही काही अपरिहार्य कारणांमुळे आपापली माघार कळवली.
  • भाऊराव माने अचानक गावी गेला.. कुणालाही काही न सांगता.

प्रत्यक्ष उपस्थिती:

प्रत्यक्ष सहलीच्या दिवशी १० पैकी ५ मित्र शिल्लक! (५०% निकाल - म्हणजेच सहल यशस्वी झाली म्हणायची 😄).
त्यातही मिलिंद दिवेकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी थोडं नाटक केलं होतं, पण आले हे महत्त्वाचं!

५ जण ठरल्यावर 'जायचं कसं?' हा प्रश्न सुटला.

दिवस: ४ ऑगस्ट २००७

रात्रीपासूनच पावसाने सहलीसाठी आपली हजेरी लावली होती - वातावरण खास सहलीसाठीच तयार झालं होतं. सकाळी ८:३० वाजता पुष्कर, विनोद, ज्ञानेश्वर आणि मिलिंद माझ्या घरी जमले. मी तर खास सहलीसाठी केशकर्तनालयात जाऊन “स्पेशल लूक” घेऊन आलो होतो! सगळ्यांनी आपापल्या गाड्या माझ्या इथे पार्क केल्या आणि आम्ही माझ्या Ford Ikon मधून निघालो. वाटेत एका दुकानात थांबून न्याहरीसाठी खाणं-पिणं घेतलं. गप्पा मारत हळूहळू पुढे जात होतो.


संपूर्ण हिरवाई, पावसामुळे उठून दिसत होती. ‘मानस लेक’ जवळ थांबून फोटो काढले. मिलिंदने तिथूनच लांबवर दिसणारा आपल्या जमिनीचा तुकडाही दाखवला. पुन्हा पिरंगुट घाटातून पुढे मार्गस्थ झालो. वाटेत हिरवळ बघत, फोटो काढत अनेक वेळा थांबलो. पिरंगुटनंतर पावसाचा जोर वाढला. कधी कधी तर रस्ताही नीट दिसत नव्हता. मनात मात्र "हिरवे हिरवे गार गालिचे…" आणि "श्रावणमासी हर्ष मानसी…" अशा ओळी आठवत होत्या.

मुळशीमध्ये मिलिंदचा एक मित्र 'लेक रेसिडन्सी क्लब' मध्ये येणार होता. सकाळीच कळलं होतं की तिथे ३०० रुपयांत दिवसभर राहता येईल. अनेक ठिकाणी विचारपूस करत शेवटी तिथे पोहोचलो. हॉटेल अगदी काही खास नव्हतं… पण व्ह्यू जबरदस्त! बुकिंग न मिळाल्याने तिथे थांबणं टळलं - आणि ३०० रुपयेही वाचले!

हॉटेलमध्ये खाणं-पिणं झाल्यावर मिलिंद, विनोद आणि ज्ञानेश्वर नदीकाठी गेले. मी आणि पुष्कर - "कशाला उगाच भिजायचं?" म्हणत गाडीतच बसून राहिलो. तिकडे हे तिघे फोटोसेशन करून परतले.

मुळशीपासून पुढे अनेक धबधबे दिसत होते. आमचा उत्साहसुद्धा धबधब्यांसारखा उसळत होता! एका मोठ्या धबधब्याजवळ थांबलो. तरीही मी आणि पुष्कर आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना न्याहाळण्यातच रमलो. धबधब्यातून बाहेर पडल्यावर भिजण्याची भूक अजून वाढलीच… त्यामुळे ताम्हीणी घाटाकडे मोर्चा वळवला. मी इतके दिवस तिथल्या निसर्गसौंदर्याबद्दल ऐकून होतो, पण प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच घेतला. धुक्यात हरवलेला रस्ता, बारीक पण सततचा पाऊस… सगळं भन्नाट! पाच फुटावर काही दिसत नव्हतं. त्या धुक्यात ज्ञानेश्वर फोटो काढायला उतरला… आणि आम्ही त्याला चालत यायला लावलं.

घाटाच्या मध्यावर एका धबधब्याजवळ पुन्हा थांबलो - फोटोसेशन झालेच पाहिजे! ज्ञानेश्वर तर सकाळपासूनच हट्ट करत होता, “सगळ्यांनी भिजायलाच पाहिजे!” पण त्यावर आमच्या सर्वांच्याच एकंदर उत्साहामुळे पाणी पडलं होतं. शेवटी मिलिंदनेच त्याला धबधब्यात ढकललं आणि पुरता भिजवला.. विनोद मात्र वाचला!!मला आणि पुष्करला ज्ञानेश्वरची थट्टा करण्याचा चेव आला… आम्ही त्याला “तुझ्या वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढतो” असं आमिष दाखवून त्याच्याकडून वाट्टेल तशा माकडचेष्टा करून घेतल्या. प्रत्यक्षात फोटो कमी, त्याचे व्हिडिओ जास्त शूट केले! 😉

अशा रीत्या सकाळी ८:३० ला निघालो आणि संध्याकाळी ६ ला माझ्या घरी परत आलो.
पोहोचल्यावर दिवसभराच्या गमती-जमतींची उजळणी झाली आणि सगळे खूश होऊन आपापल्या घरी रवाना झाले!

सहलीचे फोटो बघण्यासाठी येथे टिचकी मारा