किती मित्र येणार यापेक्षा शेवटी किती जण आले हे सांगणंच योग्य ठरेल - कारण ऐन वेळेस फक्त मिलिंद, पराग आणि ज्ञानेश्वर एवढीच कार्टी तयार झाली. मग फक्त तिघंच राहिलो म्हटल्यावर, रायगडापर्यंत जायला निघण्याऐवजी जवळच असलेला सिंहगड सर करण्याचा साळसूद विचार आम्ह केला.
दिनांक १० सप्टेंबर २००६: ठरलेल्या दिवशी सकाळीच ज्ञानेश्वर आणि मिलिंद आपापल्या दुचाकी घेऊन माझ्या घरी आले. थोडा वेळ गप्पा झाल्यावर आमचं त्रिकूट सिंहगडाच्या स्वारी साठी रवाना झालं. निघताना ज्ञानेश्वरची दुचाकी घरीच ठेवली आणि या निमित्ताने माझ्या ‘व्हिक्टर’ ला मोकळ्या हवेत फेरफटका मारायला बाहेर काढले.
वाटेत फोटो सेशन जोरात सुरू होतं - थोडं चाललं की थांबा, फोटो काढा… असा कार्यक्रम. खडकवासला येथे थांबण्याचा विचार होता, पण तिथे फारसं काही चालू नसल्यामुळे तो बेत रद्द केला. काही वेळातच आम्ही सिंहगड घाटात पोहोचलो. पावसाळा असल्यामुळे निसर्ग भन्नाट दिसत होता. ज्ञानेश्वर दुचाकी चालवत होता, त्यामुळे मला आजूबाजूच्या छान-छान गोष्टी, यथेच्च आनंद घेउन भरभरून पाहता येत होत्या. घाटात काही सायकलस्वारही दिसले, बहुधा थकल्यामुळे विश्रांती घेत होते. त्यांचं बघून मला त्यांच्या जिद्दीचं खूप कौतुक वाटलं.
पुन्हा काही वेळा थांबून फोटो काढत आम्ही साधारणत: एका तासात सिंहगडाच्या वाहनतळापर्यंत पोहोचलो. पुढचा चालत जाण्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्ही ताक आणि गरमागरम भजीवर यथेच्च ताव मारला. ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो, तिथे घाटात दिसलेले उर्वरित सायकलस्वारही दिसले. त्यांचा पोशाख थोडा हास्यास्पदच वाटला, पण त्यावर इथे फार भाष्य नको.
खाण्यापिण्यानंतर आमची खरी चढाई सुरू झाली. गनिमी काव्याने वाट काढत आम्ही सर्वप्रथम कल्याण दरवाजा काबीज केला. तिथे पोहोचल्यावर थोडा दमल्यासारखं झालं म्हणून गवतावर पहुडलो. पण काही मिनिटांतच मुलांचा एक मोठा समूह गोंगाट करत तिथे धडकला आणि त्यांचा गोंगाट ऐकून आम्ही तिथून लगेचच निघालो.
निघताच ज्ञानेश्वरने Wind Point वर जायचा आग्रह धरला. तो आमच्यात लहान असल्यामुळे त्याचं मन ठेवून आम्ही तिथे जाण्याचा त्याचा हट्ट मान्य केला. पुन्हा एकदा कडे-कपारीतून मार्ग काढत आम्ही नविन दिशेने प्रयाण केले. त्याने वाटेत Wind Point चं खूप गुणगान केलं - “तिथे प्रचंड वारा असतो; अगदी उडून जायला होइल इतपत,” वगैरे. पण प्रत्यक्ष पोहोचलो तेव्हा साधी झुळूकही नव्हती!
हवालदिल ज्ञानेश्वर आणि आम्ही तिथून मग जेवणाच्या शोधात निघालो आणि एका झोपडीवजा हॉटेलमध्ये खास सिंहगड स्टाईल झुणका-भाकरची ऑर्डर दिली. जेवता-जेवताच मिलिंद तिथेच झोपी गेला. त्यानंतर ज्ञानेश्वर आणि मी निवांत अतिशय फालतू विषयांवर गप्पा मारत बसलो आणि साधारण साडेचार वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
अशा प्रकारे आमची ही पहिली वर्षा सहल यशस्वी झाली.

No comments:
Post a Comment